अवकाळी पावसाने झोडपले

| खांब | वार्ताहर |

सतत तीन दिवस कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गाला चांगलेच झोडपून काढले आहे.

कालव्याच्या पाण्यावर आधारित पिकविल्या जाणारी भातशेती नेहमीच कोणत्या ना कोणत्यातरी संकटात सापडून शेतकरीवर्गाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. अगोदरच वाढलेल्या महागाईने शेतमालाला मिळणारा भाव हा फारच तुटपुंज्या स्वरूपातील असल्याने शेती पिकविणे परवडत नसल्याची शेतकरी वर्गाची ओरड आहे. त्यातच खते, बी-बियाणे, किटकनाशके, मजूरी, टॅक्टर व पॉवर ट्रिलर यांचे वाढते दरही शेतकरी वर्गाला परवडणारे नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी वर्ग आपापली वडिलोपार्जित शेती व्यवसाय सांभाळत असताना दरवर्षी अवकाळी पावसाने होणारे नुकसान शेतकरी वर्गाला परवडणारे नसल्याने शेती करावी की नाही या द्विधावस्थेत शेतकरी वर्ग सापडला आहे.

पाण्याचे योग्य नियोजन करता येत असल्याने उन्हाळी भातशेती म्हणजे हमखास पिक देणारी शेती असल्याने कितीही संकटे आली तरी शेतकरी मोठ्या हौसेने भातशेती पिकवितो. परंतु, आता सतत तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेती व शेतकरी वर्गाचे वर्षभराचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग दु:खाच्या छायेत लोटला आहे.

Exit mobile version