| महाड | वार्ताहर |
वणव्यांमुळे तालुक्यातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी भिवघर, कातिवडे, मोहोत या जंगलपट्ट्यांत लागलेल्या वणव्याच्या चौकशी करण्यासाठी वनखाते तसेच संबंधित अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तालुक्यातील भिवघर येथील वनप्रेमी संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार वीस वर्षांपासून जंगल संवर्धन व वणवामुक्तीचे काम करत आहेत. यामुळे भिवघर व परिसरातील गावे निसर्गदृष्ट्या समृद्ध झाली आहेत. तरीही महाड तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. सातत्याने होणार्या या घटनांमुळे जैवविविधता धोक्यात आली असून, पशुपक्ष्यांचे हाल आहेत.
वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून जाळ रेषा मारण्याचे निश्चित केले असताना प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या योजना कोणत्याही ठिकाणी राबवल्या नसल्याचे मत व्यक्त करून पवार यांनी वन विभागाकडे दाद मागितली आहे. मार्चच्या 13 व 14 तारखेला भिवघर परिसरात लागलेल्या वणव्यामुळे जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता किशोर पवार व दीपक अमराळे यांनी महाड वन विभागाच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी महाड वन विभागाचे परीक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांनी त्यांची भेट घेत तीन वर्षांपासून वणवे रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजना व इतर उपक्रमांची माहिती दिली. याबाबत वनप्रेमी व इतर पर्यावरण प्रेमी संस्थांची एकत्रित बैठक घेऊन याबाबतची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे सांगितले. वनविभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती साहू यांनी केली.
वणवामुक्त गाव संकल्पना राज्यातील सर्व गावांमध्ये वणवामुक्त गाव संकल्पना राबवणे, वन समित्यांचे प्रबोधन करणे, जाळ रेषा काढण्यासाठी तरुणांचा सहभाग घेऊन त्यांना अर्थसाह्य करणे. आधुनिक तंत्रज्ञानासह वणवा विझविण्याकरता प्रशिक्षण देणे, शिकारीला बंदी करणे अशा विविध मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या आहेत.