स्थलांतर न केल्यामुळेच जीवितहानी – चित्रलेखा पाटील

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाड, पोलादपूरमध्ये दरड कोसळल्यामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे. केवळ पायाभूत सुविधांचेच नुकसान झाले नाही तर जिवितहानीही झाली आहे. निसर्ग चक्रीवादळात ज्याप्रमाणे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते त्याप्रमाणे यावेळीही स्थलांतर करणे अपेक्षित होते. ओरिसामध्ये जेव्हा फायनी वादळ आले तेव्हा 10 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्यातही पूरग्रस्त, दरडग्रस्त भागाचे योग्यप्रकारे स्थलांतर झाले असते तर जिवितहानी टळली असती, असे मत शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नेहमीच संकटात सापडलेल्या नागरिकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणतेही राजकारण न करता त्या पूरग्रस्त, दरडग्रस्तांच्या पाठीशी नेहमीच शेकाप उभा राहिला आहे. अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. या परिस्थितीत बरेच कार्यकर्ते कायमच तळागळात काम करीत आहेत. मी स्वतः त्यांना 25 हजार किलो धान्य पाठवले आहे. त्याचबरोबर शेकापच्या अनेक संघटना, संस्थांच्या माध्यमातून मदतकार्य सुुरु आहे. शेकापच्या ज्या नगरपंचायती आहेत, त्यासुद्धा मदतीसाठी धावून गेल्या आहेत. खालापूर नगरपंचायतीचे सदस्य, कर्मचारी त्याठिकाणी आठवडाभर साफसफाईचे काम करीत आहेत. शेकापच्या माध्यमातून जेवढी मदत करणे शक्य आहे, तेवढी मदत करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version