| पनवेल | वार्ताहर |
चार अनोळखी इसमांनी लिफ्ट मागण्याचा बहाणा करून मोटारसायकल थांबवली आणि मारहाण करून मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम आणि घड्याळ घेऊन ते पळून गेले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
केशव सोनवणे हे करंजाडे गाव सेक्टर 4 येथे राहात असून, 7 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ते जुई गाव येथे गेले होते. रात्री जेवण करून आठ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारसायकलने घरी जाण्यासाठी निघाले. रात्री एकच्या सुमारास करंजाडे गावाकडील बाजूला पार्किंगजवळ खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ ते गेले. ते मोटारसायकलवरून घरी जात असताना चार अनोळखी इसमांनी थांबून लिफ्ट मागितली आणि हॉटेलला सोडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना नकार दिल्याने त्यातील दोन इसमांनी त्यांना गाडीवरून खेचले व मारहाण करून हातातील घड्याळ, खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम नऊ हजार रुपये खिशातून काढून घेतले व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बाजूला ढकलले. त्यानंतर ते सोनवणे यांच्या मोटारसायकलवर बसून तेथून पळून गेले.