मध्यान्ह योजनेचा बोजवारा; तीन-तीन महिने धान्यच नाही
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात मध्यान्ह योजनेचा बोजवारा उडाला असून, तीन-तीन महिने कित्येक शाळांना धान्याचा पुरवठाच झालेला नाही. त्यातच पुरवठा करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नुकतेच पोषण आहार राज्यस्तरीय समितीने पेण तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. परंतु, या समितीने खरे पाहता मध्यान्ह भोजन आहार धान्य पुरवणार्या ठेकेदाराचे गोडाऊन तपासणे गरजेचे होते. कारण, मध्यान्ह भोजन आहारासाठी येणारे धान्य हे निकृष्ट दर्जाचे येत असून, त्याचा सर्व दोष मध्यान्ह भोजन आहार तयार करून देणार्या बचत गटांना दिला जातो.
पेण शहराचा विचार करता कित्येक शाळांना धान्यपुरवठा न झाल्याने बचत गट मध्यान्ह भोजन आहार शिजवण्यास तयार देखील नाहीत. पोषण आहार राज्यस्तरीय समितीने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतु, ही समिती आली आणि कागदी घोडे नाचवले आणि गेली. आजच्या स्थितीला बचत गटांची अवस्था खूपच नाजूक असून, त्यांच्याकडे धान्यही उपलब्ध नाही.
तीन महिने धान्यपुरवठा होत नाही याकडे ना मुख्याध्यापकांचे लक्ष, ना गटशिक्षण अधिकार्यांचे लक्ष, ना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे लक्ष. सर्व अलबेल सुरू आहे. मध्यान्ह भोजन आहाराचे धान्य केव्हा मिळणार या प्रतीक्षेत बचत गटांच्या महिला धान्यपुरवठा करणार्या ठेकेदाराच्या रस्त्याकडे डोळे लावून बसल्या आहेत. येत्या दोन दिवसात पेण तालुक्यातील बचत गटांना धान्यपुरवठा झाला नाही तर शाळांचा मध्यान्ह भोजन आहार बंद केला जाईल, अशी स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत अधिकची माहिती घेण्यासाठी पोषण आहार निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलणे टाळले.
बचत गट मेटाकुटीस
पेण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास 190 शाळा आहेत. गेली तीन महिने यातील कित्येक शाळांना धान्याचा पुरवठाच केला गेला नाही. त्यामुळे ही बचत गट उसनवार करून मध्यान्ह भोजन आहार विद्यार्थ्यांना पुरवत आहेत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापिकांचा तोरा आणखी वेगळाच असतो. त्यामुळे अक्षरशः मध्यान्ह भोजन आहार तयार करून देणारे बचत गट मेटाकुटीस आले आहेत. तीन-तीन महिने धान्य पुरवठा होत नाही, त्यातच बिलही मिळत नाही. त्यामुळे दुकानदार बचत गटांच्या महिलांना दुकानात उभेही करत नाहीत.