एसटी संपामुळे कर्जत एसटी आगाराचे अडीच कोटींचे नुकसान

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत आगारातून प्रवाशांच्या सेवेत जिल्हाभर गाड्या सोडल्या जातात. परंतु, कामगारांच्या आंदोलनामुळ आगाराचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दोन महिने आगारातून जेमतेम दहा कर्मचारी काम करीत असून, त्यांच्याकडून वाहने प्रवाशांच्या सेवेत आहेत. मात्र, तरीदेखील तब्बल अडीच कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.
कर्जत एसटी आगारातून कर्जत येथून तसेच नेरळ आणि खालापूर तालुक्यातील खोपोली या स्थानकातून एसटी गाड्या सोडण्यात येतात. परंतु, कामबंद आंदोलनामुळे मागील सव्वा महिना कर्जत आगारातून एकही गाडी बाहेर पडली नव्हती. त्यामुळे दररोज 42 एसटी गाड्या ज्या 260 फेर्‍या प्रवाशांच्या सेवेत मारत होत्या, त्यांची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. त्या 260 फेर्‍यांमधून कर्जत आगाराला साधारण साडेतीन ते चार लाखांचा महसूल गोळा होत असतो. मात्र, 8 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंतचा महसूल गाड्या बंद असल्याने बुडाला होता. तर, या कालावधीत कामगार संघटना यांच्या आवाहनानंतर कर्जत आगारातील तब्बल 197 कामगारांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण व्हावे यासाठी कर्जत मध्ये कामबंद आंदोलन मध्ये सहभागी झालेल्या 50 कर्मचार्‍यांना आतापर्यंत बडतर्फीची कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तर आतापर्यंत केवळ 11 ते 14 कामगारांनी पुन्हा कामावर हजार होऊन सेवा देण्याचा निर्णय घेतल्याने कर्जत आगारातून आता पनवेलसाठी गाडी सोडली जात आहे. त्यामुळे कर्जत आगारातून नवी मुंबई, दादर तसेच अलिबाग, पाली, मुरबाड तसेच कराड आणि धुळे आणि तालुक्यातील 260 फेर्‍यांचे गणित कोलमडून पडले आहे. त्या गणितामुळे कर्जत आगाराचे करोडोंचे नुकसान झाले आहे.
आठ डिसेंबरपासून कर्जत एसटी आगारातून 90 टक्के वाहतूक बंद असल्याने दररोजचे आर्थिक उत्पन्न लक्षात घेता किमान अडीच कोटींचे आर्थिक नुकसानीला कर्जत आगाराला सामोरे जावे लागत आहे. सध्या पनवेलशिवाय अन्य कोणत्याही मार्गा एसटी चालविली जात नाही आणि त्यामुळे कर्जत आगाराला सध्या काही हजारांच्या व्यवसायावर समाधान मानावे लागत आहे.

Exit mobile version