हरवलेली बॅग दहा तासांत शोधली

| पनवेल | प्रतिनिधी |

रिक्षातून प्रवास करताना हरवलेली 11 लाख 50 हजार रुपये किमतीची मौल्यवान ऐवज असलेली बॅग पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत शोधून काढली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेत बॅगेतील सर्व ऐवज सुरक्षित हस्तगत केला. त्यानंतर हा मुद्देमाल संबंधित महिलेला परत करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण येथील अर्चना जाधव (61) या पनवेल रेल्वे स्थानक ते बसस्थानक असा रिक्षाने प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांची पांढऱ्या व निळ्या पट्ट्याची जगदंबा नावाची बॅग रिक्षात राहिल्याने गहाळ झाली. या बॅगेत पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अडीच तोळ्यांची दोनपदरी सोन्याची माळ, 1 लाख 18 हजार रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 11 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रेल्वे स्थानक ते पळस्पे फाटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. तांत्रिक तपासातून संबंधित रिक्षाचालक राजू गणपत सावंत (63) यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली.

Exit mobile version