महाड एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी
। महाड । प्रतिनिधी ।
हरवलेले मोबाईल शोधण्यात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे. सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘CEIR’ पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे ही कारवाई यशस्वी झाली आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध काळात मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार डी. बी. बल्लाळ यांनी तांत्रिक तपास सुरू केला. केंद्र सरकारच्या ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलची मदत घेत या मोबाईलचा माग काढण्यात आला आणि अखेर 6 मोबाईल हस्तगत करण्यात आले.
महाड एमआयडीसी पोलिसांनी 2026 या वर्षात आतापर्यंत एकूण 13 मोबाईल शोधून काढले आहेत. या हस्तगत केलेल्या सर्व मोबाईलची एकूण किंमत 4 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. आपल्या हक्काचा मोबाईल पुन्हा मिळाल्याने सर्व तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागरिकांना आवाहन:
मोबाईल हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच, केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर आपल्या मोबाईलची नोंदणी करावी, जेणेकरून तांत्रिक तपासाद्वारे तो शोधणे सोपे होईल, असे आवाहन महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.






