ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा
। रायगड । वार्ताहर |
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणार्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन किंवा तीन पेक्षा अधिक वीजबिले भरून ग्राहकांना योजनेच्या लाभाची संधी साधता येणार आहे. कल्याण आणि भांडुप परिमंडळातील जवळपास 80 टक्के ग्राहक डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरतात. उर्वरित 20 टक्के ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
01 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी ड्रॉव्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. रांगेत उभे राहून वेळ, श्रम व पैशांचा अपव्यय करण्याऐवजी महावितरणच्या उपलब्ध संकेतस्थळ, मोबाईल अॅप व इतर सुविधांमार्फत ऑनलाईन वीज बिल भरून ग्राहक 0.25 टक्क्यांची सवलतही मिळवू शकतात.
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक महिने वीज बिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणचे राज्याच्या विविध भागांमध्ये कोट्यवधींच्या संख्येने ग्राहक आहेत. त्यांच्यामार्फत दररोज लाखो युनीट वीजेचा वापर केला जातो. घरगुती ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या ग्राहकांच्या माध्यमातून वीजेचा वापर करण्यात येता. त्या बदल्यात महावितरण ग्राहकांना ठराविक रकमेचे बिल पाठवते. काही ग्राहक हे वेळवर वीज बिलाचा भरणा करतात. तर काही ग्राहक हे वेळे अभावी रक्कम भरण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे वीज बिलाची कोट्यवधींची थकबाकी राहते. यावर उपाय योजना करण्यासाठी महावितरणने सदरच्या योजनेची शक्कल लढवली आहे.