। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
शनिवारी 11 जानेवारी 2025( पौष शुक्ल द्वादशी ) रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापानेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मुरुड शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे प्रथम वर्धापन दिन साजरा होणार आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा आनंदोत्सव दीर्घकाळ साजरा होत राहावा तसेच, हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथील मंदिर हा जिव्हाळ्याचा विषय असल्याकारणाने त्यांचा वर्धापन दिन साजरा व्हावा. ही भावना मुरुडमधील सर्व समाज अध्यक्षांच्या बैठकीमध्ये एकमुखाने मान्य झाली. मुरुडमधील 45 समाज, पाखाडी आणि शहरातील दानशूर व्यक्ती यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली असून, सामाजिक एकोपा वाढीस लागावा हा या आयोजनाचा उद्देश आहे. आगामी काळामध्ये शिवजयंती, नारळी पौर्णिमा हे सण सुद्धा अशाच उत्साहामध्ये साजरे केले जातील असे कार्यकर्त्यांनी सांगितले. 11 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये सर्व समाजांनी आपापल्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा सार्वजनिक जागेमध्ये भजन, पूजा, नामस्मरण, पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम करावेत. दुपारी 12.30 वाजता आरती करावी असे आवाहन करण्यात आले आहे.