। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या रोगांचे निदान होत आहे. परंतु, योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढवून त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. या अनुषंगानेच स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.12) जासई येथील रा.जि.प. मराठी शाळेत करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल, मेडीकव्हर हॉस्पिटल, न्यु ईरा हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल यांचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल यांच्या सौजन्याने मोफत औषध रुग्णांना देण्यात येणार आहेत. या महाआरोग्य शिबिरात पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या 40 पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत. दीपक क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉईड चेकअपची सेवा देण्यात येणार आहे. तसेच, आर जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक असल्यास योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.