संशईत गुरांची तपासणी; पशुंपालकामध्ये चिंतेचे वातावरण
। सुतारवाडी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील 17 तारखेला सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान पशुपालकांनी परिसरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे गुरावरील लम्पी आजाराची लक्षणे दिसत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर विभागीय डॉक्टरांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली होती. दुसर्याच दिवशी तालुका पशुवैद्यकीय अधिकार्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या गुरांचे रक्ताचे नमुने व नाकातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे पुढील तपासणीकरीता पाठविले.
त्यात आंबिवली येथील रामचंद्र सपकाळ यांची एक गाय व दुरडोली येथील रामदास किरजन यांची एक गाय व दोन महिन्याचे एक वासरू अशा तीन जनावरांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुंपालकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन गुरांवर योग्य ते उपचार करण्यात आले. आता या तिन्ही जनावरांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपाय अधिकारी व रोहा तहसीलदार यांच्या परिसरातील पाच किलोमीटरच्या आतील गुरांचे लसीकरण करण्यात आलेे. आतापर्यंत एकूण 1370 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लम्पी हा आजार गोचडी, कीड, माशा यामुळे पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत रोजच्या रोज परिसरामध्ये फवारणी व ग्रामपंचायतीमार्फत परिसरामध्ये रोजच्या रोज खबरदारी घेण्यासाठी उपयोजनांची दवंडी देण्यात येत असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगले यांनी दिली.
रोहा तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची काही लक्षणे आढळल्यास थेट 1962 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा तसेच त्या गुरांना क्वारंटाईन करून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळवावी.
शुभदा पाटील
रोहा पंचायत समिती, मुख्य अधिकारी