कोकणात आलिशान क्रुझ सफर

गुहागरातील वेलदूर येथे थांबा, पर्यटन व्यवसाय भरभराटीस मिळणर चालना
। गुहागर । वृत्तसंस्था ।
मुंबई ते गोवा या सागरी मार्गावरील आलिशान प्रवास सुरू झाला असून याचा फायदा गुहागरलाही मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते गोवा या प्रवासात या आलिशान क्रुझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणार्‍या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शृंगारतळी येथे दिली.
कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेत, या आलिशान क्रुझमधून सर्व सुखसोयींनीयुक्त अशी ही सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, मुंबई ते थेट गोवा अशी सोय असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रुझला थांबा नव्हता. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रुझला थांबा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहितीही आमदार जाधव यांनी दिली. क्रुझच्या या वेलदूर येथील थांब्यामुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा प्रवासावर या आलिशान क्रुझला वेलदूर येथे थांबा मिळाल्यास गुहागरच्या पर्यटन व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याची आशा येथील पर्यटनप्रेमींनी केली आहे.
गुहागर तालुक्यातील काही समुद्र किनार्‍यावर प्रसिद्ध देवस्थाने असून, या देवस्थानांनाही पर्यटकांना भेट देता येईल. गुहागरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये चांगली वाढ व्हावी व येथील तरुणांना व व्यावसायिकांना रोजगार मिळावा यासाठी आ. जाधव पूर्वीपासूनच आग्रही आहेत.

Exit mobile version