उन्हाळ्यात लिचीची बाजारात एंट्री

गोड चवीसोबतच किंमतही चढी

| पनवेल | प्रतिनिधी |

उन्हाळा सुरू होताच विविध हंगामी फळांची रेलचेल वाढली असून, सध्या लिची फळाचे बाजारात जोरदार आगमन झाले आहे. पनवेल परिसरात सध्या लिचीचा दर सुमारे 200 रुपये पाव किलोपर्यंत पोहोचला असूनही ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारपेठेत लिची या रसाळ आणि गोड फळाने धूम माजवली आहे. आकर्षक लालसर साल आणि आतल्या पांढऱ्या, सुगंधी गरामुळे हे फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाग दर असूनही चव आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे लिचीला चांगली मागणी मिळत आहे. मूळतः चीनमधील हे फळ भारतात बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. सध्या या राज्यांतून येणाऱ्या लिचीची बाजारात मोठी आवक होत आहे. आरोग्यदृष्ट्या लिची अत्यंत उपयुक्त मानली जाते. यात व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचेही गुणधर्म या फळात आहेत.

बाजारात लिचीपासून तयार होणारे ज्यूस, शरबत, आईस्क्रीम आणि विविध डेझर्टलाही चांगली मागणी आहे. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लिचीचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी किंवा अतिप्रमाणात सेवन केल्यास काहींना त्रास होऊ शकतो. एकूणच, चव आणि आरोग्याचा संगम असलेले लिची फळ यंदाच्या उन्हाळ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, बाजारपेठेत चांगलीच रंगत आणत आहे.

Exit mobile version