शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
ज्येष्ठ साहित्यिक कांतीलाल कडू लिखित ‘व्यासांचे महाभारत’ या कादंबरीचे प्रकाशन ज्योतिष मठाचे शंकराचार्य तथा अयोध्या श्रीराम मंदिर न्यास समितीचे पदाधिकारी स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी बोलताना स्वामींनी ही कादंबरी समाजाला नवी दिशा देणारी आणि वैचारिकतेचा खजिना ठरणारी कलाकृती असल्याचे गौरवोद्गार काढले.
ज्येष्ठ साहित्यिक तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, कविवर्य प्रा. अशोक बागवे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे आणि लेखक कांतीलाल कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि कडू यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी महाभारत ही केवळ ऐतिहासिक घटना नसून सामाजिक शिक्षणाचे आणि जीवनमूल्यांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. व्यास महाराजांच्या जीवनाचा आणि महाभारताच्या व्यापक आशयाचा सखोल अभ्यास करून कांतीलाल कडू यांनी ही कादंबरी अत्यंत प्रभावी शैलीत साकारली असल्याचे त्यांनी नमूद केले. कादंबरीतून वाचकांना चिंतन, मनन आणि जीवनदृष्टी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनी केले. तसेच कादंबरीतील 31 व्या प्रकरणाचे अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी अभय पैर यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साहित्य, अध्यात्म आणि इतिहासाचा संगम घडवणारा हा प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरला.






