महाड पनवेलसाठी अधिक गाड्या
| महाड | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात शहरवासीय कोकणात दाखल झाले आहेत. ज्या पद्धतीने गणेश भक्तांना कोकणात आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने सुविधा निर्माण करून दिली होती त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासाला देखील महाड आगार सज्ज झाले आहे. महाडपासून पनवेलपर्यंत महाड आगाराकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.
गणेश उत्सवाला बुधवार दि.27 ऑगस्टपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. शहरवासीय एसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गावी आले आहेत. त्यामुळे दीड दिवसीय आणि पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केल्यानंतर परतीच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनेकांना हा प्रवास मोठा त्रासदायक होतो. एसटी बरोबरच खासगी वाहने देखील मिळत नसल्याने प्रवाशांना दिवसभर वाहनाची वाट पहावी लागते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाकडून चांगल्या प्रकारे नियोजन केले जात आहे. राज्यभरातील एस.टी.च्या गाड्या कोकणात अधिक प्रमाणात मागवल्या जातात. महाड आगाराने देखील अशाच पद्धतीने नियोजन केले असून गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला एसटी सज्ज झाली आहे. महाडमधून मुंबई, नालासोपारा, परळ, ठाणे, बोरिवली, उरण, कल्याण, पुणे अशा विविध ठिकाणी जादा एसटी बसेसची सुविधा निर्माण केली आहे. महाड आगाराकडून जवळपास 100 बसेस या मार्गावरून धावणार आहेत. तसेच, महाडपासून पनवेलपर्यंत जाण्याकरता महाड एसटी आगाराने जवळपास 50 ते 60 बसेस तयार ठेवल्या आहेत. महाड आगारातून ग्रुप बुकिंग करण्यासाठी तसेच अन्य सुविधा करता महानगर प्रमुख रितेश फुलपगारे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अमोल खाडे, स्थानक प्रमुख उदय हाटे, निरीक्षक तुषार हाटे, कार्यशाळा प्रमुख डावरे, लिपिक चिनके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आगारातच प्रवासी वाहतूक केंद्र
महाड आगारातच प्रवासी वाहतूक केंद्र उभे करून याच ठिकाणी बुकिंग करत महाड-पनवेल करीता बसेस धावणार आहेत. महाड-पनवेल बसेसमुळे मुंबई सह अन्य ठिकाणी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे. गावी आलेल्या गणेश भक्तांना ग्रुप बुकिंग देखील करता येणार आहे. ग्रुप बुकिंगमुळे एसटी बस थेट त्यांच्या गावातून सुटणार आहे. त्यामुळे या सुविधेचा देखील लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. महाड आगारामध्ये नुकतेच नवीन शौचालय स्वच्छतागृह देखील सुरू करण्यात आले आहे.
शहरातून आलेल्या गणेश भक्तांच्या सुविधेसाठी गाड्या आणि चालक-वाहक गुंतले असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांवर थोडा फरक पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनी या होणाऱ्या गैरसोयीबाबत सहकार्य करावे.
रितेश फुलपगारे,
आगार प्रमुख, महाड






