महाड-धुळे एसटी सुरु

। पोलादपूर । वार्ताहर ।

शहरात आणि तालुक्यातील खान्देशी रहिवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी खान्देश एकता मंडळाची स्थापना करण्यात आली असून खान्देश विभागात महाडमधून अधिक बससेवा उपलब्ध व्हाव्यात अशी मंडळाची प्रमुख मागणी होती. त्यानुसार मंडळाने महाड एस. टी. डेपोचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांना सुमारे पाचशेहून अधिक खान्देशी रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कार्यवाही करत महाड ते धुळे आणि धुळे ते महाड या फेर्‍यांना मंजुरी दिली आहे.

सदरच्या फेर्‍या मे. साई गणेश टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत सुरू होणार आहेत. महाड ते धुळे आणि धुळे ते महाड या फेर्‍या दररोज सकाळी 6 वाजून 45 या वेळेत सोडण्याच्या सूचना सदरच्या विभागाने रायगड (पेण) विभाग नियंत्रक, मे. साई गणेश टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स आणि धुळे विभागाचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक यांना दिल्या आहेत. महाड-माणगांव ताम्हिणी मार्गे पुणे (शिवाजी नगर) – अहमदनगर-शिर्डी -कोपरगांव- येवला-मनमाड- मालेगांव- धुळे असा या बसचा पल्ला असणार आहे. धुळयावरून येणार्‍या बसचा पल्ला देखील याचमार्गे महाडला येताना असणार आहे.

सध्या मे महिन्याच्या सुट्टयांचा हंगाम सुरू आहे आणि या धर्तीवर महाड ते धुळे ते महाड या बसेस सुरू होत असल्याने खान्देशी रहिवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे खान्देश एकता मंडळाच्या एका प्रमुख मागणीला यश आले असून मंडळाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच महाड डेपो मॅनेजर यांचे आभार व्यक्त केले. यापुढेही खान्देश एकता मंडळ तालुक्यातील खान्देशी रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्‍वास मंडळाच्यावतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version