महाड-रायगड मार्ग धुळीने माखला; रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय

। महाड । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाणार्‍या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि रायगड प्राधिकरणाने हाती घेतले आहे. याकरिता रस्त्यावर खोदकाम आणि पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन पावसाळ्यात रायगड परिसरातील नागरिकांना, वाहनचालकांना पावसाळ्यापूर्वीच त्रास सुरु झाला आहे. अक्षय बिल्डर्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत चालू असलेले हे काम गतीने होत असले तरी प्रत्यक्ष काँक्रिटीकरण कामाला कालावधी लागणार आहे यामुळे पावसाळ्यात वाताहत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.मंगळवार आणि बुधवार दोन दिवस रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा असुन शिव भक्तांना याच मार्गाने जावे लागणार आहे.
नाते खिंडीपासून रायगड किल्ल्याच्या चित्त दरवाजापर्यंत रस्त्याचे पूर्णपणे काँक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी या रस्त्याच्या कामाला सन 2019 ला सुरुवात करण्यात आली, मात्र पूर्वीच्या ठेकेदाराने मागील दोन वर्षात संथ गतीने काम केल्याने रस्ते विकास प्राधिकरणाने या ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदार नेमला. सद्या अक्षय बिल्डर्स अँड कंट्रक्शन ही कंपनी रस्त्याचे काम करत आहे. महाड नाते खिंड ते रायगड किल्ल्या पर्यंत रस्त्याचे काम अक्षय बिल्डर अँड कंट्रक्शन या कंपनीने मागील दोन महिन्यापासून सुरू केले आहे. या रस्त्याचे काम करत असताना पूर्वीचा डांबरी असलेला रस्ता पूर्णपणे काढून टाकला आहे. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा नवीन काँक्रिटीकरण होणार्‍या रस्त्याची उंची वाढणार आहे. त्यासाठी जागोजागी मातीचा भराव टाकला जात आहे.


रस्त्याच्या काँक्रीट करण्याच्या कामासाठी प्रथम मातीचा भराव टाकून नंतर खडीकरण व त्यानंतर काँक्रीटीकरण अशा पद्धतीने नवीन रस्ता तयार होणार आहे. त्यासाठी पूर्वी डांबरीकरण असलेला रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे चापगाव पर्यंत रुंदीकरण करत मातीचा भराव टाकण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याची लांबी 24 किलोमीटर असून दुपदरी म्हणजे 48 किलोमीटर लांबीचा हा रस्ता हा रायगड पर्यंत होणार आहे. सुमारे 25.609 किमीचा हा रस्ता होणार असून 10 मीटरचे काँक्रीटीकरण आणि 2 मीटरची साईडपट्टी होणार आहे. कोंझर गावापासून नवीन मार्गाचे 3.50 किमी अंतराचे काम केले जाणार आहे. याकरिता 2 वर्षाचा कालावधी देण्यात आला असून या कामासाठी 1038 वृक्षांची तोड केली जाणार आहे.
महाड रायगड रस्त्याचे काम करणारी अक्षय बिल्डर्स अँड कंट्रक्शन कंपनी ही मूळची कर्नाटकातील कंपनी असून ही कंपनी धरणाची कामे करत असल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्याच्या कामाचा अनुभव आहे अगर नाही याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. या रस्त्याच्या कामासाठी कंपनीने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या वाळसुरे गावच्या हद्दीत सर्वे नंबर 39/2 43/9 -, 43/9 इ1 या जागेवर काँक्रीट करण्याचा प्लांट उभारीत आहे. सदरचा प्लांट उभारण्याचे काम चालू आहे. हा प्लॅन्ट प्रत्यक्ष चालू होण्यास किमान पंधरा दिवसाचा अवधी लागणार आहे. यामुळे प्रत्यक्षात काँक्रीट रस्ता सुरू करण्यास उशीर झाला आहे. मातीचा रस्ता तयार केल्यानंतर भर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तयार होणार आहे.
कोकणात मे महिन्याच्या 15 तारखेपासून मान्सून पूर्व स्थिती चालू होण्यास सुरुवात होते. कोकणात विशेषता महाड रायगड किल्ला हा सह्याद्रीचा पर्वतरांगेमध्ये असून साधारणतः अडीच हजार ते तीन हजार मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस रायगड खोर्‍यामध्ये पडतो. याची सुतराम कल्पना अक्षय बिल्डर्स अँड कंट्रक्शन कंपनी नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. या मार्गावर धावणार्‍या वाहनांसाठी पर्यायी डांबरी रस्ता तयार न करताच मातीचा सपाट रस्ता तयार करण्यात आल्याने पावसाळ्यात वाहनचालकांचे हाल होणार आहेत. सद्या या मार्गावर पर्यायी डांबरीकरण न केल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याबाबत महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयातून कामाचा अंदाज घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे संताप व्यक्त करत आहेत.

Exit mobile version