। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण काम मागील अनेक वर्षांपासून संथगतीने होत आहे. मात्र आता या कामाला गती मिळून पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कासू ते इंदापूर या टप्प्यातील कामाचा शुभारंभ रविवारी (3 एप्रिल) होणार असल्याची माहिती खा.सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथील पत्रकार परिषदेत दिली. या कामाला 750 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम कधी पूर्ण होणार? प्रवाशी नागरिक कोकणवासीय जनतेचा प्रवास कधी सुरक्षित व सुखकर होणार ही चिंता सर्वांना सतावत आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गाने आजवर झालेल्या अपघातात हजारो निष्पाप जीवांचा बळी घेतला. या महामार्गाचे काम जलदतेने पूर्ण व्हावे यासाठी खा.सुनिल तटकरे प्रयत्नशील आहेत व त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम मागील बारा वर्षे रखडलेल्या अवस्थेत आहे. अतिवृष्टी व अवजड वाहतूक यामुळे या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत होती. त्यामुळे हे काम डांबरीकरण ऐवजी काँक्रिटीकरण माध्यमातून व्हावे अशी मागणी मी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे. आता पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर अशा दोन टप्प्यात या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.