चवदार तळ्याचे ‘ओंजळभर पाणी’ पत्रकार भवनात अर्पण
| मुंबई | प्रतिनिधी |
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. चवदार तळ्याचे प्रतीकात्मक ‘ओंजळभर पाणी’ मुंबईतील आझाद मैदानाजवळील पत्रकार भवनात आणण्यात आले असून, ते शुक्रवारी तिथे उभारण्यात आलेल्या तळ्याच्या प्रतिकृतीला अर्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचनही करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि ‘समान संधी अभियान’चे अध्यक्ष सुनील कदम यांनी दिली.
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाला सामाजिक समतेच्या लढ्यातील ऐतिहासिक टप्पा मानले जाते. जगातील लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीशी या क्रांतीची तुलना केली जाते. त्यामुळे 20 मार्च 1927 रोजी झालेल्या या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 1868 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी दुष्काळाच्या काळात पुण्यातील आपल्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला होता. त्यानंतर चार दशकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्यावर समतेसाठी सत्याग्रह उभारून दलितांना सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा दिला.
या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त शताब्दी वर्षाचा प्रारंभिक समारंभ ‘समान संधी अभियान’ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 13 मार्च रोजी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 4 ते 9 या वेळेत आझाद मैदानाजवळील पत्रकार भवनात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विवेक कुमार राहणार असून, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. तसेच प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी आणि मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभर मानवी हक्क आणि लोकशाही मूल्यांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंचित आणि उपेक्षित समाजघटकांच्या प्रगतीसाठी राज्यव्यापी कृती कार्यक्रम राबविण्याची योजना असल्याची माहिती ‘समान संधी अभियान’चे अध्यक्ष सुनील कदम यांनी दिली.
