पेपर फुटल्याने खळबळ; लाखो उमेदवारांचा हिरमोड
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी (दि.28) आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने लाखो उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत उद्या म्हणजेच रविवार दि.28 जून रोजी संपूर्ण राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र, शनिवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथील काही व्यक्तींकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीसांनी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, या इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
आधीच या टीईटी (TET) परीक्षे संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे मोठी चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा आधीच वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी होती. अशातच आता थेट पेपर लीक झाल्याने शिक्षण विभागाने ही परीक्षा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.







