सोयी-सुविधांचा अभाव, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, खेळाडूंची गैरसोय
। महाड । वार्ताहर ।
चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची प्रतिमा खेळात उंच व्हावी तसेच एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळांचा सराव खेळाडूंना करता यावा यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाड तालुक्यातील लाडवली येथे उभारण्यात आले, मात्र सोयी-सुविधांचा अभावामुळे क्रीडा संकुलाची इमारत धूळ खात पडली आहे. संकुलात खेळाडू तयार होण्याऐवजी याचा वापर आता तळीराम व भिकारी करू लागले आहेत.
तालुक्यातील होतकरू खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने तालुक्यातील लाडवली ग्रामपंचायत हद्दीत एक एकर जागा संपादित करून तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. सरकारने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला घेतल्यानंतर 2016 मध्ये लाडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाड तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. संकुलासाठी एक कोटीचा निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 83 लाख रुपये वर्ग करण्यात आले. या क्रिडा संकुलासाठी आवश्यक असणार्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संकुल पूर्ण होण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला.
खेळाडूंसाठी हे क्रीडा संकुल खुले होण्यापूर्वी इमारतीच्या बांधकामाची मोडतोड झाली असून फरशा तुटल्या आहेत. संकुलातील फरशा, विद्युत साहित्य, स्वच्छतागृहातील साहित्याची चोरी झाली आहे. त्यामुळे इमारत पूर्ण होऊनही धूळ खात पडली आहे. याठिकाणी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. मात्र हे संकुल आणि त्याची रचना चुकीची असल्याचे क्रीडा तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर त्याचीदेखील दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. क्रीडा संकुलाची इमारत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणे अपेक्षित होते. मात्र शहराजवळ जागा उपलब्ध नसल्याने जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू ऑलिंपिकसाठी तयार व्हावेत हा उद्देश यातून सफल होताना दिसत नाही तसेच यामुळे या ठिकाणी लहान खेळाडू तसेच इतर खेळाडू यांना ये जा करणे शक्य नसल्याने संकुलाचा वापरदेखील मर्यादित राहणार आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
नेहुलीतील क्रीडा संकुलाचीही दुरवस्था
नेहुली येथे उभारण्यात आलेल्या संकुलाचीही दुरवस्था झाली असून एकेक विभाग हळूहळू बंद होत आहे. संकुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाला किमान 15 लाख रुपयांची गरज असताना क्रीडा कार्यालयाकडे फक्त दोन लाख रुपये शिल्लक आहेत. निधीच नसल्याने इनडोअर स्टेडिअमचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
उत्तम खेळाडू निर्माण करायचे असतील तर त्यांना दर्जेदार सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. महाड येथे क्रीडा संकुल असूनही त्याचा उपयोग खेळाडूंना होत नसेल तर हा खेळाडूंवर अन्याय आहे. हे संकुल सर्व खेळाडूंसाठी लवकर उपलब्ध व्हावे.
– सई शिंदे, खेळाडू