जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन शनिवारी (दि.6) रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने महामानवाच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे, माजी नगरसेविका संजना किर, अनिल चोपडा तसेच भारतीय बौध्द महासभा, बौध्दजन पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी, बौध्दाचार्य, महिला, तरुण मंडळींसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री मेणबत्ती प्रज्वलीत करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी शनिवारी सकाळी बुध्द विहारांमध्ये तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. अलिबाग नगरपरिषदेतदेखील महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, संजना कीर, संजना किर, नगरपरिषद कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यालयातही महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळया शासकीय कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सायंकाळी आरसीएफ कॉलनी येथून मेणबत्ती प्रज्वलीत करून शुभ्रवस्त्र परिधान करीत पायी रॅली काढण्यात आली. ही रॅली आरसीएफ कॉलनी, पिंपळभाट, चेंढरे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत काढण्यात आली. या रॅलीला अनुयायींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

हजारो अनुयायी चैत्यभूमीकडे
चैत्यभूमी हे मुंबईतील दादर चौपाटीजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ आहे. बौध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायींसाठी एक पवित्र श्रध्दास्थान आहे. याठिकाणी लाखो जनसमुदाय सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येतात. सहा डिसेंबर 1956 मध्ये महामानवाच्या निर्वाणानंतर बैौध्द पध्दतीने अंत्यसंस्कार या भूमीत करण्यात आले. या भूमीला चैत्यभूमी ओळखले जात आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीमध्ये राज्यासह देशभरातील लाखो अनुयायी दाखल झाले. रायगड जिल्ह्यातील दहा हजारहून अधिक अनुयायी चैत्यभूमीवर गेले. काही अनुयायी शनिवारी सकाळी तर काही अनुयायी दोन दिवस अगोदरच दादरला दाखल झाले.
Exit mobile version