महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांतील अन्न ‌‘रडार‌’वर!

तुकाराम मुंढेंचा सर्वधर्मीय सणांसाठी वर्षभराचा स्थायी आदेश

| मुंबई | प्रतिनिधी |

सण-उत्सवांच्या काळात भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांतील अन्नाची गुणवत्ता आता अन्न व औषध प्रशासनाच्या थेट रडारवर राहणार आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‌‘सर्व सणांसाठी स्थायी आदेश‌’ जारी केला आहे. या आदेशानुसार महाप्रसादाच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली जाणार असून, सर्वधर्मीय सणांसाठी वर्षभर लागू राहणारा असा आदेश प्रथमच काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सणांमध्ये मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मांसाहारी पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीला आळा घालण्यासाठी एफडीएने वर्षभराचे सणांचे कॅलेंडर तयार केले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या हे राज्यव्यापी सण, तर मकरसंक्रांत, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, वारी, जन्माष्टमी, दहीहंडी, गुरुनानक जयंती आदी प्रादेशिक सणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

सणाच्या 21 दिवस आधीपासून सणानंतर 30 दिवसांपर्यंत मोहीम राबवली जाणार आहे. पूर्वतयारी, नाका तपासणी, सणाच्या दिवशी भरारी पथकांकडून सरप्राईज तपासणी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई अशा चार टप्प्यांत कारवाई होईल. भगर, साबुदाणा, राजगिरा, दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी, बर्फ, मिठाईवरील चांदीचा वर्ख आणि खाद्यरंग यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. ई-कॉमर्स, आयात अन्नपदार्थ, बेकरी आणि पॅकबंद पाण्यावरही एफडीएची नजर राहणार आहे. सण संपल्यानंतर 14 दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींवर न्यायालयात खटले दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नसून, हा स्थायी आदेश वर्षभर लागू राहणार आहे.

Exit mobile version