राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्र राज्याला जाहीर झाला आहे.

जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. गुजरात दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार तर पाणी वापर संस्थामध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्थेने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी मंगळवारी केली. पुरस्कार वितरण येत्या 18 नोव्हेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यंदा 10 विविध श्रेणींमध्ये संयुक्त विजेत्यांसह एकूण 46 संस्था आणि व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून 751 अर्ज प्राप्त झाले होते. केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने विजेत्यांची निवड केली आहे.

Exit mobile version