अलिबागच्या वकिलांचा संघ उपांत्य फेरीत
। रायगड । वार्ताहर ।
नाशिकमध्ये सध्या महाराष्ट्र आणि गोव्यातल्या वकिलांसाठीच्या राज्यस्तरीय टी-20 क्रिकेट स्पर्धा दिमाखदार थाटात सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध जिल्ह्यातील 78 वकिलांचे संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवारी स्पर्धेच्या उप-उपांत्य फेरीचे सामने पार पडले, त्यात अलिबाग वकिलांचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
या स्पर्धेत अलिबाग सी-हॉक्स अॅडव्होकेट्स क्रिकेट संघाचा सामना बॉम्बे सिटी क्रिकेट संघा विरुद्ध खेळला गेला. त्यामध्ये अॅड.रोहित भोईर यांनी दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रथम फलंदाजी करताना अलिबाग सी-हॉक्स संघाने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 159 धावा केल्या. सुरुवातचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रोहित भोईर यांनी एक बाजू सांभाळत 58 धावा ठोकल्या. त्यात 4 षटकार आणि 2 चौकरांचा समावेश होता. रोहितला हृषीकेश माळी, समीर बंगाली, ऋग्वेद ठाकूर, मनिष पतीलची साथ मिळाली.
स्नेहेंद्र पवार यांनी 4 षटकात 19 धावांमध्ये 4 बळी टिपले, त्याला प्रशांत गावंड आणि प्रशांत म्हात्रे यांनी दुसर्या बाजूने साथ दिली त्यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले. बॉम्बे सिटी क्रिकेट संघाचा 20 षटकांच्या समाप्ती नंतर 9 गडी बाद 127 धावा झाल्या. अलिबागने सामना 32 धावानी जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामनावीर म्हणून भेदक गोलंदाजी करणार्या अलिबागचा बडी-बॉय स्नेहेंद्र पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अलिबागच्या वकिलांच्या क्रिकेट संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.