खासगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या पाट्या

कारवाईची होतेय मागणी

| उरण | प्रतिनिधी |

खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन अथवा प्रेस असे लिहीलेल्या पाट्या सर्रास दिसून येत आहेत. अशा वाहनांच्या आडून गैरकृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोसिस यंत्रणेने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी दोर धरत आहे.

कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला, तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. तरी उरण परिसरात हे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी कर्मचारी आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलिस कारवायांपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुटका मिळावी यासाठी वाहनांवर पोलिस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, पत्रकार आदी पाट्या सर्रासपणे लावल्या जातात. आरटीओच्या नियमाप्रमाणे, खासगी वाहनांवर अशा प्रकारे नाव वापरणे हा गुन्हा आहे. मात्र, तरीही अनेक सरकारी अधिकारी खासगी वाहनांवर अशा पाट्या लावत आहेत. याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली असता, संबंधित गाडीमालक पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यामुळे आरटीओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

पोलिसांनी खासगी वाहनांवर पोलिस असे लिहिण्यास कायद्याने बंदी आहे. अनेक पोलीस कर्मचारी या कायद्याचे उल्लंघन करून आपल्या गाड्यांवर पोलिस असे लिहिलेली पाटी लावतात. शिवाय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी गाड्यांवर महाराष्ट्र व केंद्र शासन असेही लिहिता येत नाही, पण त्यांच्याकडून नियमाचे उल्लंघन केले जात आहे. शासकीय कामासाठी ज्यागाड्या भाडेतत्त्वावर शासनाने घेतल्या होत्या; पण आता त्यांचा करार संपला आहे. अशा गाड्यांच्याही दर्शनी भागावर अजूनही महाराष्ट्र शासन असे लिहिलेले असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रशिक्षणार्थी वकील, डॉक्टर आपल्या दुचाकीवर ॲडव्होकेट, डॉक्टर असे स्टीकर व सिंबॉल काढतात; पण हे कायद्यानुसार योग्य नाही. परिणामी, अशा व्यक्तींनी नियमांची पायमल्ली केली तर कारवाई होणे गरजेचे आहे. फॅन्सी नंबरप्लेट्स गाडी क्रमांकाच्या पाटीवर क्रमांकाशिवाय दुसरे काही लिहिता येत नाही; पण या नियमाचे उल्लंघन करत शहरात फॅन्सी नंबरप्लेट्सच्या अनेक गाड्या धावत आहेत. याशिवाय भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृतीदेखील खासगी गाडीवर लावून त्याचा गैरवापर करण्यात येतो. यावर कारवाई करण्याची गरज आहे.

Exit mobile version