2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट
काळजी घेण्याचे आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
फाल्गुन संपत असतानाच राज्याला वैशाख वणण्याने भाजून काढायला सुरुवात केल्याने सर्वत्र लाही लाही झाल्यासारखे वातावऱण निर्माण झालेले आहे वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पारा चाळीशीच्याजवळ पोहोचला आहे. येत्या 2 एप्रिलपर्यंत उन्हाचा पारा कायम राहणार असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई,कोकणला दिलासा
21 ते 24 मार्च आणि 29 ते 2 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवण्यात आल्या आहेत. बुधवारपासून राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत आहे. मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल पारा चाळीशी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारीच मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या आसपास होते.
मुंबईत तापमानाचा पारा कमी असला तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसंच उष्ण वार्यामुळे नाशिककरांची झोप उडाली आहे. जळगाव, नाशिक जिल्ह्यात 30 मार्च, 1 आणि 2 एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल. तर, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात 30 व 31 मार्च आणि 1, 2 एप्रिल अमरावती, बुलडाणा, 30 आणि 31 मार्च, चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च तर, नागपूर जिल्ह्यात 30 मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक सक्रीय असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढ अधिक जाणवू लागली आहे. मंगळवारी विदर्भ विभागात चंद्रपूरमध्ये 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. गडचिरोली वगळता इतर सर्वच केंद्रांवर पारा 40 अंशांच्या आसपास होता. मराठवाड्यातही परभणी आणि नांदेड या दोन्ही केंद्रांवर 41 अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले.
अशी घ्या काळजी गरज असेल तरच घर,कार्यालयातून बाहेर पडा सकाळच्या सत्रातच आवश्यक कामे करा दुपारी बाहेर पडण्याचा धोका टाळा लहान मुले,वयोवृद्धांनी घरीच थांबणे योग्य बाहेर पडताना डोक्यावर पांढरे कापड गुंडाळा तोंडाला मास्क लावा,सोबत पाणी ठेवा थंड पेये पिण्याचा मोह टाळा चक्कर येत असल्यास कांदा जवळ ठेवा