हेलिकॉप्टर सेवेचा प्रारंभ
। सुधागड । पाली (गौसखान पठाण) ।
महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे दर्शन आता थेट हवाई सफरीद्वारे अवघ्या पाच -ते सहा तासात घेणे शक्य होणार आहे.यासाठी हवाई सफरीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हेलिकॉप्टर द्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (ता.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पूणर्र् करता येणार आहे.यासाठी
वरद हेलिकॉप्टर सर्व्हिसेसचे हे हेलिकॉप्टर आहे. ओझर येथून सकाळी 8:46 ला या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत या पाच प्रवाशी भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर बुधवारी (दि.30) दुपारी 1:45 वाजता पालीत पोहोचले. इथे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धंनजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त राहुल मराठे, सचिन साठे व माधव साने यांच्यासह शेखर सोमण व देवस्थान कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. मांडे यांनी येथील हेलिपॅड व व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच 14 जणांनी या हेलिकॉप्टर दर्शन सेवेसाठी आगाऊ बुकिंग केले असून अनेक जण विचारणा करत आहेत असे मांडे यांनी सांगितले. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिक व लहनग्यांनी येथे मोठी गर्दी केली होती.
जे भाविक या सेवेचा लाभ घेतील त्यांना सर्व अष्टविनायक देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांचा प्रवासातील वेळेची बचत होणार आहे. शिवाय हेलिकॉप्टर सफरीचा आंनद देखील घेता येणार आहे.
वरद हेलिकॉप्टर सर्विसेस ही चांगली सेवा देत आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये हेलिकॉप्टर प्रवासाची भीती असते. अनेक वृध्दांना तर आणखी भिती असते. पण आम्ही सत्तरीच्या पुढचे लोक आहोत. ब्लड प्रेशर व इतर आजाराचा प्रवासामध्ये काही त्रास होत नाही. आपण कारमध्ये बसून प्रवास करतो तस येथे वाटते. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. प्रत्येक ठिकाणी आमचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले आहे. अष्टविनायकांच्या सर्व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक आभार मानतो. – बी. व्ही. मांडे, हेलिकॉप्टर प्रवासी भाविक
भक्तासांठी सुविधा
देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शन व्यवस्था अभिषेक, सत्कार व अल्पोपहार व्यवस्था. देवस्थानतर्फे हेलिपॅड ते मंदिरापर्यंत वाहनाची व्यवस्था, भाविकांना राहत्या शहरातुन प्रवास सुविधा उपलब्ध.
हे नियम पाळा
सहा व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर सुविधा
आरोग्य तपासणी आवश्यक, प्रवासाची संपूर्ण रक्कम अदा करावी लागेल. राहत्या शहरापासून हेलिपॅड पर्यंतचा वाहनाचा प्रवास खर्च आकारला जाईल.