आठव्यांदा पटकावला दुहेरी मुकुट
| नवी दिल्ली| वृत्तसंस्था |
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी (किशोर व किशोरी) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. दुहेरी मुकुटाला गवसणी घालण्याची महाराष्ट्राची ही आठवी खेप ठरली हे विशेष. महाराष्ट्राच्या किशोर संघाने बाराव्यांदा; तर किशोरी संघाने सतराव्यांदा ही स्पर्धा जिंकली. महाराष्ट्राचे दोन्ही कर्णधार सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले. हाराध्या वसावेला भरत; तर मैथिली पवारला ईला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कर्नाटक येथे ही स्पर्धा झाली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीच्या लढतीत कर्नाटकच्याच संघांना पराभूत करताना आपले वर्चस्व कायम ठेवले. किशोर विभागाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा 34-22 असा 12 गुणांनी पराभव करीत अजिंक्यपदावर नाव कोरले. कर्णधार हाराध्या वसावे (3 मि. संरक्षण आणि 2 गुण) आणि आदेश पाटील (1.40 मि. संरक्षण आणि 8 गुण) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मध्यंतराला महाराष्ट्राने 16-8 अशी 8 गुणांची आघाडी घेतली. याच आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला कर्नाटकवर सहज मात करणे शक्य झाले.
किशोरी विभागात महाराष्ट्राने कर्नाटकचा 16-14 असा एक डाव 2 गुणांनी सहज धुव्वा उडवला. महाराष्ट्र संघातर्फे कर्णधार मैथिली पवार (2, 1.30 मि. व 6 गुण), स्नेहा लोमकाणे (1.20, 1.40 मि. संरक्षण व 6 गुण) यांनी सर्वोत्तम खेळ केला.