महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. क्रीडा अर्थव्यवस्थेला नवे पंख देणाऱ्या निर्णयांची नांदी मुंबईत रुजवली. उद्योग, गुंतवणूक आणि उद्योजकतेच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने क्रीडा उद्योग विकास विभागाची अधिकृत स्थापना केली. शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या एमएसीसीआयएने या उपक्रमाद्वारे क्रीडेला औद्योगिक ओळख देत राज्याच्या क्रीडा अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. या क्रीडा उद्योग विकास समितीची घोषणा बुधवारी (दि.4) एमएसीसीआय अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी केली.

एमएसीसीआयएनेच्या शतक महोत्सवी वर्षात क्रीडा उद्योग विकास विभागाची स्थापना हा एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय मानला जात आहे. औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रात भक्कम कार्य करणाऱ्या एमएसीसीआयएने आता क्रीडा क्षेत्रालाही उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे. या समितीवर क्रीडा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच, क्रीडा उद्योगात गुंतवणूक सुलभता वाढविणे, क्रीडा पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक-खासगी-भागीदारी मॉडेल राबविणे, क्रीडा तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्यांवर समिती विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच क्रीडा क्षेत्राला अधिकृतपणे उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे विविध उपाययोजना आणि धोरणात्मक प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. चेअरमन सुनील वालावलकर, सह-चेअरमन मंदार वैद्य, सदस्य क्षितिज वेदक, बाळासाहेब तोरसकर, विपुल सोळंकी, वैशाली भिडे-बर्वे, पौलोमी कुंडू, तसेच एमएसीसीआय अध्यक्ष रवींद्र माणगावे आणि उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी हे पदसिद्ध पदाधिकारी म्हणून समितीला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे या विभागाच्या कामाला अधिक बळ मिळणार आहे.

महाराष्ट्र क्रीडा उद्योगाचे केंद्र बनणार
या नव्या विभागाच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा क्षेत्राला व्यावसायिक बळ मिळणार असून रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि जागतिक संधींचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य क्रीडा उद्योग केंद्र बनविण्याच्या दिशेने हे पाऊल निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, एमएसीसीआयच्या क्रीडा उद्योग विकास विभागाच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उद्योगाभिमुख परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धोरणात्मक विचार, सक्षम नेतृत्व आणि व्यापक दृष्टीकोन यांच्या बळावर क्रीडा क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

नवस्थापित क्रीडा उद्योग विकास विभाग क्रीडा क्षेत्राला केवळ खेळापुरते मर्यादित न ठेवता, ते उद्योजकता, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहभाग निर्माण करणारे सक्षम आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. राज्यातील क्रीडा उद्योग अधिक संघटित, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा व्यापक रोडमॅप या विभागाद्वारे राबविण्यात येणार आहे.

रवींद्र माणगावे,
अध्यक्ष, एमएसीसीआय
Exit mobile version