। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना दि.23 जून 1984 साली झाली. या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने अलिबाग पोलीस मुख्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे म्हणाले की, खेळामुळेच माझे व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत झाली. खेळाने मला विविध जीवनमूल्ये शिकविली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या खेळामध्ये अधिक परिश्रम घेवून भविष्यात आणखी चांगली कामगिरी करावी. या कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, श्री शिवछपत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संदिप गुरव, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती दिपाली शिळधणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांची माहिती, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास याबाबत शासनस्तरावरुन केले जाणारे उपक्रम यांची माहिती उपस्थित खेळाडूंना दिली. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात क्रीडा पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला