। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
गोलंदाजांच्या भेदक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने मेघालयचा 9 गडी आणि 214 चेंडू राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या मेघालयचा डाव 37.1 षटकांत 113 धावांत गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने हे आव्हान 14.2 षटकांत पार केले आहे. आणि ‘ब’ गटात 12 गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले आहे. यावेळी, विजयासह सरासरीही अधिक चांगली करण्याची समोर आलेली संधी महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी साधली आहे.
दरम्यान, गेल्या सामन्यात शतकी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड सलामीला आला नाही. यावेळी, ओम भोसले आणि सिद्धेश वीर यांनी सलामी केली. त्यांनी 16.5 षटकांत 97 धावा फटकावल्या. ओम भोसले 46 धावांवर बाद झाला, तर सिद्धेश वीरने नाबाद 57 धावा केल्या. सिद्धेशने गोलंदाजीतही 3 बळींचे योगदान दिले आहे. तसेच, महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छाव आणि रजनीश गुरबानी यांनीही प्रत्येकी2 बळी मिळविले आहेत. महाराष्ट्राचा पुढचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे.