नव्या गाईडलाईन्स जारी
। मुंबई । प्रतिनिधी ।
नवं वर्ष सुरू होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नववर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पार्टीचं आयोजन केलं आहे. काही जण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घरीच नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. तर काही जण मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात आहेत. मात्र नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पॅक एवढीच दारू मिळणार आहे.
चार पॅकपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
चालकाची व्यवस्था करणार
सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी. त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.