इलेक्ट्रोल एजचा एक्झीट पोल समोर
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील एकूण 288 जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अर्थात बहुमतासाठी एकूण 145 जागा आवश्यक आहेत. तत्पूर्वी, आता राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यातच नुकताच ‘इलेक्ट्रोल एज’चा पोल समोर आला आहे. यात भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या पोलमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘इलेक्ट्रोल एज’च्या अंदाजानुसर महायुतीतील भाजपा 78 जागांसह सर्वात मोठा पक्ष अथवा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर येताना दिसत असला तरी महायुतीला मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. महायुतीच्या हातातून राज्यातील सरकार जाताना दिसत आहे. महायुतीतील भाजपच्या 78 जागांशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) 26 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 14 जागा, अशा एकूण 118 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 145 जागांची आवश्यकता आहे. अर्थात, या मॅजिक आकड्यापासून महायुती दूर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘इलेक्ट्रोल एज’च्या पोलनुसार, काँग्रेस 60 जागांसह राज्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष तर महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. याशिवाय, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला 46 जागा, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागा मिळताना दिसत आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडीला एकूण 150 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात, महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, इतरांना 20 जागा मिळण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे.