| रोहा | प्रतिनिधी |
जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने केले जात असताना रोहा तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आज बुधवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी जन सुरक्षा विधेयक रद्द करा, संविधान बचाव, बचेंगे तो जितेंगे, आमचा लढा न्याय हक्कासाठी या घोषणेने परिसर दणाणले होते.
यावेळी प्रचंड जनसमुदाय यांसह मोठ्या संख्येने सर्वहरा आंदोलनाचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चात तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील देशमुख, काँग्रेस कार्यकर्ते हरीओम टाळकुटे, फैसल अधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष तुषार खरीवले, रोहा तालुका शिवसेना (उबाठा) प्रमुख नितीन वारंगे, काँग्रेसचे विनोद सावंत, सर्वहरा जन आंदोलनाचे तालुका अध्यक्ष सोपान सुतार, पांडुरंग वाघमारे यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. रोहा रायकर पार्क येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्या ठिकाणी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जन सुरक्षा कायदा हा सरकारची हुकूमशाही आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्यांची गलचेपी होणार आहे. लोकशाही धोक्यात आणणारा हा कायदा आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करा अन्यथा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व सर्वहारा संघटना हा लढा अधिक तीव्र करून सरकारला सळो की पळो करुन सोडून असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांनी दिला.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचा रोह्यात निषेध मोर्चा
