। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात सरळ लढत होत आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना काँग्रेसने जाहीर पाठींबा दिल्याने आघाडी अधिक मजबूत झाल्याचे मत अनिल नवगणे यांनी कृषीवलसोबत बोलताना व्यक्त केले आहे.
गेल्या आठवड्यात श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, तळा आणि रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी म्हसळा येथे अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता काँग्रेसचा अनिल नवगणे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केल्याने श्रीवर्धन मतदार संघातील मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यावेळी अनिल नवगणे यांनी सांगितले की, गेली 20 ते 25 वर्षे या मतदार संघाशी चांगला संपर्क असून मुंबई मंडळाशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता काँग्रेसनेदेखील पाठींबा जाहीर केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.