250 भाताचे भारे जळून खाक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोदिवले येथील शेतकर्यांच्या शेतातून कापून आणलेला भाताच्या मोळ्यांना आग लावण्यात आली आहे. पाच शेतकर्यांनी साठवून ठेवलेले 250 हून अधिक भाताचे भारे पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील कोदिवले येथे रात्री येथील पाच शेतकर्यांच्या शेतातील भाताचे भारे साठवून ठेवले होते. तेथील शेतकरी भगवान तरे, केशव तरे, नाना तरे आणि संतोष तरे यांच्या सामूहिक भातशेतीतून पिकविलेल्या भातपिकाची कापणी करून शेतावर भारे साठवून ठेवण्यात आले होते. पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास काही विकृत वृत्तीच्या प्रवृत्तींनी हे वर्षभर पिकविलेले धान्य पेटवून देत राखरांगोळी केली आहे. या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी शेतावर धाव घेतली; परंतु, तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. आधीच नैसर्गिक संकटांनी शेतकरी हवालदिल झालेला असताना, या घटनेने शेतकर्यांवर उपासमारी ओढावली आहे.
या शेतकर्यांनी काबाडकष्ट करून हातातोंडाशी आलेला घास लावलेल्या आगीमुळे नष्ट झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांमार्फत सखोल चौकशी होऊन ज्या कोणी हा प्रकार केला आहे, या घटनेबाबत बोलताना अॅड. पंकज तरे यांनी मागे काही महिन्यांपूर्वी आमच्या शेतावरील बोअरवेलमधील मोटार काढून चोरून नेली व त्याचबरोबर बोअरवेलमध्ये दगड टाकून त्याचेही नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाने करावी, अशी मागणी केली आहे.