1 डिसेंबरला उरण तहसीलवर धडक; मोर्चाच्या तयारीसाठी गावोगावी बैठकांचा धडाका
| उरण | प्रतिनिधी |
न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर भाजप आमदार महेश बालदी यांच्या आमदारकीचा मुद्दा उरणमध्ये तापला आहे. आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने 1 डिसेंबर रोजी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी आणि विभागनिहाय बैठका सुरू झाल्या असून, विरोधकांनी आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे.
2010 मधील मारहाण प्रकरणात अलिबाग न्यायालयाने 19 नोव्हेंबर 2026 रोजी महेश बालदी यांच्यासह अन्य तिघांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 8(3) नुसार त्यांच्या आमदारकीच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची घोषणा केली. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष पाटील, नगराध्यक्षा भावना घाण्ोकर, तालुका चिटणीस रवी घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, नरेश घरत, संतोष घरत, नितीन पाटील, भास्कर मोकल, नगरसेविका वंदना पवार, नाहीदा ठाकूर, वैष्णवी पाटील, प्रमिला पवार, प्रार्थना म्हात्रे, केणी, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर आणि कविता पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बालदी समर्थकांनी सोशल मीडियावर महिलांच्या सन्मानाबाबत केलेल्या पोस्टवरूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केले. संबंधित प्रकरणातील महिलेच्या सन्मानाचा प्रश्न तेव्हा का लक्षात आला नाही, असा सवाल करत महिलांच्या सन्मानाचा मुद्दा सोयीने वापरू नये, अशी टीका त्यांनी केली. आगामी विधानसभा अधिवेशनातही आमदारकीच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. मंगळवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राघोबादेव मंदिर, कोटनाका येथे जमून तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे.







