| चिरनेर | प्रतिनिधी |
नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात रंगात आलेला आहे. शनिवारी (दि.29) उरणमध्ये महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी दणक्यात जाहीर सभा घेतली. त्या सभेत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी तुफान बॅटिंग केली. उरणच्या सत्य परिस्थितीची पोलखोल नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणून जनतेसमोर आणली. तेव्हा विकासाच्या नावाने कोट्यवधींच्या गप्पा मारणाऱ्या उरणच्या आमदारांचा सर्वांनी समाचार घेतला. त्यामुळे उरणची सभा प्रचंड गाजली.
यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे म्हणाले, उरणच्या जनतेने मीठ पिकविले, त्या मिठाची तरी जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्याच पदरी गेल्या दहा-पंधरा वर्षांत निराशा आली आहे. उरणमध्ये आज प्राथमिक सुविधाही नाहीत, ही खेदाची बाब आहे. दोन महापालिका 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे उरण हे चकचकीत शहर असेल, असा माझा अंदाज होता, परंतु तो अंदाज येथे आल्यावर खोटा ठरला. निसर्गाने उरणला भरभरून दिले आहे, पण आज उरण शहर भकास झाल्याचे दृश्य दिसतेय. याचा जाब सर्वसामान्य जनतेने विचारलाच पाहिजे. आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर या उरणच्या विकासासाठी सक्षम आहेत. त्यांच्यात धमक आहे. त्या भूमिपुत्र आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदी भावना घाणेकर निवडून येणे ही काळाची गरज आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्या मामा या सभेत गरजले. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ!, जिसका राजा व्यापारी, प्रजा भिकारी, अशी बेरकी टीका बाळ्या मामा यांनी उरणमध्ये केली. ते पुढे म्हणाले, भूमिपुत्रांनो, आपापसांतल्या मतभेदांमुळेच उरणच्या डोक्यावर येऊन कोणी तरी बसले, आता वेळ गेलेली नाही. चूक सुधारा. नवी मुंबईच्या विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या हालचाली दिसत नाहीत, 20 डिसेंबरपर्यंत जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही तर मी 22 डिसेंबरला चालत भिवंडीवरून लाखोंच्या संख्येने विमानतळाला धडक देईन. दिबांचे नाव ही आपली अस्मिता आहे, तिला जर कोणी नख लावणार असेल तर भूमिपुत्र खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे गरजल्या. त्या म्हणाल्या, चहापेक्षा किटली गरम. सध्या पीएंची चलती आहे. सध्या भाजपच्या काही नेत्यांच्या पीएंचे कारनामे चव्हाट्यावर येताहेत. त्यातच आता उरणमध्ये कोणा शहा नावाच्या पीएंची बायको नगराध्यक्षपदासाठी उभी करून येथील भूमिपुत्रांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. भूमिपुत्रांनो, सावध व्हा. रात्र वैऱ्याची आहे. डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा आणि योग्य बटन दाबून भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी शांतपणे काम केले, मात्र लसीकरणाच्या जाहिराती भाजपने केल्या. काँग्रेसने 14 लसी मोफत दिल्या, पण कधी जाहिरातबाजी केली नाही. सध्या फक्त जाहिरातबाजी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे पक्षच फोडत नाहीत, तर कुटुंबही फोडतात, अशी खरमरीत टीका सुषमा अंधारे यांनी उरणमध्ये केली.
यावेळी आंतराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले, भावना घाणेकर या रणरागिणी आहेत. त्या अनेक वर्षे समाजासाठी लढताहेत, पायाला भिंगरी लावल्यागत त्या राज्यभर धडाडीने काम करीत आहेत. उरण शहर आज बकाल झाले आहे, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवार भावना घाणेकर यांच्या रूपाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना दिबांचा विसर पडला आहे. बोलघेवडे सत्ताधीश चालढकल करीत आहेत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव दिले गेले नाही. त्यामुळे आपल्या अस्मितेची ही लढाई आहे. हीच वेळ आहे सत्ताधीशांना जागा दाखवायची. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देऊन सत्ता परिवर्तानाची सुरुवात उरण भूमिपुत्रांच्या आणि हुतात्म्यांच्या नगरीतून करू या. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्वच नेते उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश गावंड, क्रॉ. भूषण पाटील, गोपाल पाटील, नरेश रहाळकर, विनोद म्हात्रे, सुधाकर पाटील, रवी घरत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.






