खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत; भर पावसात जीवाची पर्वा न करता, घरे प्रकाशीत करण्याचा प्रयत्न
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे महावितरणला देखील मोठा फटका बसला आहे. अलिबाग तालुक्यातील उसरपासून वावे परिसरातील अनेक भागातील वीज खांब व रोहित्रांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. मात्र, नागरिकांच्या घरात प्रकाश यावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 99 टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. तसेच, झुकलेले पोल सरळ करणे व अन्य कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथील उपकेंद्राच्या अखत्यारित असंख्य गावांचा समावेश आहे. त्यात हजारो विज ग्राहकांचा समावेश आहे. या भागातील गावे, वाड्यांमधील नागरिकांसह कंपन्यांना विज पुरवठा करण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते. दरम्यान, जिल्ह्यात दि.4 ते 6 जुलै या कालावधीत अतिवृष्टी होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात रविवारपासून सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे या आलेल्या वादळी पावसामुळेे तालुक्यातील वावे आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे येथील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे येथील विजेच्या तारा तुटून पडल्या. तसेच, महावितरणच्या लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांचे खांब देखील कोसळले. तर, काही खांब वाऱ्यामुळे एका बाजूला झुकले होते. त्यामुळे या वादळी पावसात 20 खांब, 2 रोहित्र, 15 गाळाच्या वीजेच्या तारा व 7 विद्यूत खांबांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विद्यूत खांब कोसळलेल्या भागातील रोहित्र तात्पुरते बंद करण्यात आल्याने परिसरातील अनेक गावे, वाड्यांसह संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. त्यामुळे अंंधार पडलेल्या घरात उजेड आणण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी भर पावसात बाहेर पडले. विजेची समस्या ओळखून दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. फणसापूर शाखेतील कनिष्ठ अभियंता विश्वजीत महाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पथकाने गस्त सुरू केली. यावेळी अनेक भागांत पाणी साचले होते. मात्र, पावसासह पाण्याचा विचार न करता, रात्रीचा दिवस करून कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पुर्ववत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून पडलेले विद्यूत खांब उभे करून तारा बसविण्यात आल्या. त्यामुळे 99 टक्के वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरण कंपनी यशस्वी ठरल्याची माहिती उपलब्ध झाली असून, अन्य कामे प्रगती पथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
नुकसानीवर दृष्टीक्षेप
विद्यूत खांब - 20
रोहित्र - 02
गाळाच्या तारा - 15
झुकलेले खांब -07
मुसळधार पावसामुळे रोहित्रांसह विजेच्या तारा, खांबांचे नुकसान झाले. नागरिकांच्या घरात उजेड यावा, यासाठी रात्रीचा दिवस करून कर्मचारी काम करीत आहे. आतापर्यंत 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.
महावितरण कंपनी,
अधिकारी
