महावितरणचा वीज चोरांना शॉक

| कल्याण | प्रतिनिधी ।

महावितरणच्या कल्याण परिमंडळात विविध पथकांनी ऑगस्ट महिन्यात घातलेल्या धाडीत 1189 ठिकाणी वीज चोऱ्या सापडल्या आहेत. वीज चोरट्यांनी 2 कोटी 13 लाख रुपये किंमतीची वीज चोरी केली आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून कायदेशीर नोटीस बजावली असून विहित मुदतीत पैसे न भरल्यास त्यांच्यावर वीज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महिनाभरात उल्हासनगर 1 आणि 2 विभागात सर्वाधिक 420 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी 43 हजार युनिट वीज चोरी केली आहे. पालघर जिल्ह्यात 369 वीज चोऱ्या या काळात पकडण्यात आल्या. येथे वीज चोरांनी 1 लाख 63 हजार वीज युनिट चोरी केल्याचे आढळून आले. विरार आणि कल्याण ग्रामीण विभागात प्रत्येकी 204 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहे. वरील पैकी 167 वीज ग्राहकांनी तडजोड शुल्कापोटी 5 लाख 77 हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. उर्वरित वीज ग्राहकांवर विहीत मुदतीत तडजोड शुल्क न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली आहे.

Exit mobile version