9 नोव्हेंबरला कोल्हापुरात महामोर्चा
| मुंबई | प्रतिनिधी |
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी निवडणुकीत दिलेला कौल डावलून गोकुळ दूध संघावर कब्जा करण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. पाच सरकारी सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय म्हणजे स्वाभिमानी कोल्हापूरकरांचा अपमान असून सहकार क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार आहे, असा घणाघात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केला. या निर्णयाविरोधात 9 नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गुरुवारी गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. गोकुळमध्ये पाच सरकारी सदस्य नियुक्त करण्यासाठीच सरकारने स्वतंत्र कायदा आणला असून साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना त्यातून वगळण्यात आले आहे. निवडणूक झाल्यानंतर कायदा करून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज गोकुळसाठी केलेला कायदा उद्या अन्य सहकारी संस्थांनाही लागू केला जाऊ शकतो. देशभरात अमूल आणि मदर डेअरी हेच दोन ब्रँड ठेवण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोकुळवर साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार अवलंबून असून, दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांना सुमारे 100 कोटी रुपये दूध बिलापोटी दिले जातात. दररोज 20 लाख लीटर दूध संकलन करणारी ही संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कौल डावलून सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या कायद्यामागे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासोबतच न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
