महायुतीच्या मताधिक्यात घट

उरण, कर्जतच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा

| उरण | वार्ताहर |

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्ट्रिक करून विजयी झाले आहेत. परंतु, मागील विधानसभा निवडणूक निकाल बघता, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे पाटील यांना आघाडी मिळाली असून, मताधिक्यात झालेली घट आमदारांसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असतानाही चार मतदारसंघात त्यांना मिळालेल्या आघाडीमुळे बारणे यांना हॅट्ट्रिक करणे शक्य झाले आहे. मात्र, मागील निवडणुकीत साथ दिलेल्या उरण व कर्जत मतदारसंघात पीछेहाट झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात आघाडीचे वाघेरे पाटील यांना आघाडी मिळाली आहे.

मागील वेळी 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजयी झालेले बारणे यांना यावेळी ही आघाडी टिकविण्यात यश आले नाही. यंदा 96 हजाराच्या मताधिक्याने बारणे निवडून आले आहेत. यावरून त्यांच्या मताधिक्यात घट होताना दिसत आहे. घाटाखाली मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदार संघात बारणे यांना मागील निवडणुकीत 54 हजारांची आघाडी मिळाली होती. यावेळी बारणे यांना 31 हजारांची आघाडी मिळाली आहे. तर, भाजपाचे आमदार महेश बालदी यांच्या उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीचे वाघेरे पाटील यांना 13 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. तसेच आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे असतानाही त्यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बारणे यांच्यापेक्षा आघाडीचे वाघेरे पाटील यांना 17 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली आघाडी ही आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत एकप्रकारे धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version