रायगडात शिमग्याआधी राजकीय शिमगा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
गद्दारांची पहिली पिलावळ महेंद्र थोरवे अशी घणाघाती टीका माजी आमदार आणि तटकरे पुत्र अनिकेत तटकरेंनी करीत थोरवेंचा खरपूस समाचार घेतला. इतकेच काय तर, विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचे फोटो, व्हिडीओ तटकरेंनी माध्यमांना दाखवले आणि भांडाफोड केला. यापूर्वी खा. सुनील तटकरे यांनी शिंदे शिवसेनेच्या आमदारांना क्रिकेटच्या मैदानातून कोपरखळ्या दिल्या होत्या. त्यानंतर आ. थोरवे यांनी खा. तटकरे यांचे नाव न घेता पलटवार करीत आपला औरंगजेब सुतारवाडीला, अशी जहरी टीका केली होती.
रायगडातील क्रिकेटची मैदाने राजकीय आखाडे बनू लागली आहेत. कोकणातील शिमगा सण हा लोकप्रिय असतो, मात्र या शिमग्याआधी राजकीय शिमगा सुरू झाला आहे हे खरे. सुप्रसिद्ध छावा चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली आणि आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय, अशी विखारी टीका कली. औरंगजेबाची उपमा तटकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. गदारांची पहिली पिलावळ महेंद्र थोरवे म्हणत अनिकेत तटकरेंनी थोरवेंचा खरपूस समाचार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे शिवसेनेवर भयंकर संतापले. ठिकठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध करून प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केले. यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवेंवर टीकेचा भडिमार केला. कालची आलेली गद्दारांची पिलावळ जर अशा प्रकारचे वल्गना करत असतील, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. गद्दारांची पिलावळ ही कर्जतच्या महेंद्र थोरवेंपासून सुरुवात झाली असल्याचे तटकरे म्हणाले.
आम्ही महायुतीमध्ये कोणताही तडा जाऊ नये त्याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने घेत होतो. काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरेंवर टीका केली. त्यापलीकडे जाऊन आम्हालासुद्धा तोंड उघडता येतो. मी लोकसभेला निवडणुकीला रायगडातून उभा राहिलो, तर तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यत्व पद राहणार नाही. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या या वक्तव्यावरदेखील अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना सुनावले आहे.
आधी स्वतःच्या निवडणुकीत स्वतःच्या वार्ड मध्ये पुढे होतात का हे पहा….आम्ही काम केले नसते तर श्रीरंग बारणे अजून मागे गेले असते. स्वतःच्या जिल्हा परिषद मतदार संघातूनसुद्धा खासदारकीच्या निवडणुकीत तुम्ही मागे आहात, असा थोरवे यांच्या वक्तव्याचा तटकरे यांनी खरपूस समाचार घेतला. तर महेंद्र थोरवे यांनी आत्मपरीक्षण करावे मग बाकीच्या वल्गना कराव्यात असा सूचक सल्ला ही अनिकेत तटकरे यांनी दिला, गद्दारांची पिलावळ यावर महेंद्र थोरवे आता कसा करारा जवाब देणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.