| पोलादपूर | प्रतिनिधी |
वाकण येथे बुधवारी दुपारी गुरांचा गोठा वणव्याने पसरलेल्या आगीमध्ये भस्मसात होऊन 2 लाख 18 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याखेरिज विविध ठिकाणी वणव्यांच्या घटनांमध्ये मोर-लांडोर तसेच अन्य पक्षी तसेच असंख्य वन्यजीव होळपळून जिवंत जाळले जात असल्याने वणवाविरोधी मोहिमेच्या निष्क्रियता दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुधवारी वाकण येथे महामून इब्राहिम जोगीलकर यांच्या दोन जर्सी गायी आणि दोन वासरे यांच्यासह पेंढा, वासे, मेढे, लगे, नांगर, इतर वस्तू व जोखड असा एकूण 2 लाख 18 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल गोठ्यासह खाक झाल्याचा पंचनामा प्रभारी ग्राममहसूल अधिकारी आर.बी. पवार यांच्यामार्फत पोलादपूर तहसिल कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. वाकण येथे जळालेला गोठा हा जोगीलकर यांच्या घरापासून 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असून जोगीलकर यांच्या उदरनिर्वाहाचे साधन दुग्धव्यवसाय असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मदतीसाठी दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले आहे.