पात्रता फेरीत रौप्यपदकावर मोहोर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची नेमबाज महेश्वरी चौहान हिने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली. तिने महिलांच्या स्कीट प्रकारात रौप्यपदकाची कमाई करीत भारताला पॅरिस ऑलिंपिकसाठीचा कोटा मिळवून दिला. हा भारताचा 21 वा ऑलिंपिक कोटा ठरला. दोहा येथे पॅरिस ऑलिंपिकची पात्रता फेरी आयोजित करण्यात आली होती.
महेश्वरी चौहान हिने रौप्यपदक जिंकत ऑलिंपिक कोटा मिळवल्यानंतर आनंदी भावना व्यक्त केली. ती म्हणाली, गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मेहनत केली आहे. त्यामुळे साहजिकच आनंद होत आहे. शूट ऑफमध्ये थोडीशी बिथरली. मात्र, माझ्या कामगिरीने समाधानी आहे. दरम्यान, भारताची महेश्वरी चौहान व चिलीची फ्रान्सिस्का चाडीड यांच्यामध्ये 60 शूटनंतर 54-54 अशी बरोबरी झाली. त्यामुळे शूटऑफचा अवलंब करण्यात आला. यामध्ये फ्रान्सिस्काने महेश्वरीला 4-3 असे पराभूत केले. त्यामुळे फ्रान्सिस्काने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. महेश्वरीला रौप्यपदक मिळाले. ती पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली होती. चीनच्या जियांग यितींग हिने ब्राँझपदकाची कमाई केली.