| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका सभागृहात नगरसेवक म्हणून जाण्याचे स्वप्न पाहणारे अनेक कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर जोरदार कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात उत्साहात सामील होत आपापल्या पक्षातील वरिष्टांची मर्जी संपादित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड हे कार्यकर्ते करत आहेत. 2024 सालची लोकसभा निवडणूकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. यामुळे विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक उमेदवार तसेच, विद्यमान आमदार कामाला लागले आहेत.
आपापल्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराच्या पारड्यात जास्तीत जास्त मते टाकून आपल विधानसभेच तिकीट निश्चित करून घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पनवेल पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हातात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पनवेल पालिकेच्या निवडणुकीच बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने आगामी पालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराकडे संधी म्हणून काही कार्यकर्ते पाहत आहेत. याचकरता मग आपापल्या प्रभागत जास्तीत जास्त कार्यकर्ते जमवून वरिष्ठानवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तिकिटासाठी उत्सुक कार्यकर्ते करत असल्याचे पाहायला मिळत असून, एकाच प्रभागात तिकीट मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या दोन कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकी आधीच एका प्रकारची स्पर्धा सुरु आहे.
काही माजी नगरसेवक प्रचारापासून दूरच पालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी काही जण उत्साहात कामाला लागलेले असताना 2016 पालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळालेले काही माजी नगरसेवक मात्र प्रचारापासून दोन हात लांब असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही माजी नगरसेवक नावालाच प्रचारात सहभागी होत असून, काही जण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर गेल्याचे चित्र आहे.