संरक्षण भिंतीच्या प्रतिक्षेत ‘मैदान’

संबंधित बिल्डरवर कारवाईची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ ग्रामपंचायतीमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची भिंत तीन वर्षापूर्वी तोडण्यात आलो होती. त्या भागात बांधकाम व्यवसायिकांनी इमारत बांधकाम साहित्य नेण्यासाठी मैदानाची भिंत तोडली होती आणि नंतर दुरुस्त करून देणार होते. मात्र, इमारत पूर्ण झाल्यानंतर देखील बिल्डरकडून मैदानाची भिंत बांधण्याची कार्यवाही केली जात नाही. दरम्यान, भिंत बांधून देण्याची लेखी हमी देणारे बिल्डर आता भिंत बांधणार नसेल तर त्या बिल्डरवर नेरळ ग्रामपंचायतीकडून बोजा टाकण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे नेरळ गावातील ग्रामपंचायत मालकीचे एकमेव मैदान आहे. त्या मैदानाच्या बाजूला असलेला भूखंड एका बिल्डरने विकत घेतल्यावर त्या जमिनीवर इमारत बांधायची होती. मात्र, तेथे इमारत बांधण्यासाठी बांधकाम साहित्य नेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेवटी त्या बिल्डरने ग्रामपंचायतमधील काही सदस्यांना हाताशी धरून थेट छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची भिंत तोडली आणि आपल्या जागेत जाण्यासाठी रस्ता तयार केला. मैदानाची भिंत तोडल्याने आणि मैदानात बांधकाम साहित्य ठेवले जाऊ लागल्याने त्याबाबत खेळाडू आणि कुंभार आळीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला.

बांधकाम साहित्यांमुळे मैदानात खेळण्यासाठी येणार खेळाडूंना इजा पोहचत होती. स्थानिकांचा आक्षेप आणि नेरळ गावातील अनेकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शेवटी ग्रामपंचायतने संबंधित बिल्डरला नोटीस बजावली. त्यावेळी बिल्डरकडून आपले बांधकाम पूर्ण झाल्यावर संपूर्ण मैदान बांधकाम साहित्य मुक्त करण्याचे आणि संरक्षण भिंत पुन्हा बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्या बिल्डरची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची भिंत काही बांधून पूर्ण झाली नाही. मैदानाची भिंत न बांधता बिल्डर आपले काम संपवून निघून गेला आहे. त्यामुळे बांधकाम साहित्य नेण्यासाठी तोडलेली भिंत कोण बांधून देणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आता एप्रिल मे महिना असून मैदानावर खेळण्यासाठी दररोज असंख्य खेळाडू येत असतात. मात्र, तुटलेल्या भिंतीमुळे आणि तेथील बांधकाम साहित्य तसेच पडून असल्याने खेळाडूंना दररोज किरकोळ जखमा होत आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत ने पुढाकार घेवून मैदानाची तोडलेली भिंत पुन्हा बांधून घ्यावी यासाठी संबंधित बिल्डर का नोटीस काढावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. दुसरीकडे नेरळ शिवसेना ठाकरे गटाने त्या भिंतीचे बांधकाम बिल्डर करून देणार नसेल तर ग्रामपंचायतने आपल्या मिळकतीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी संबंधित बिल्डरने बांधलेल्या इमारतीवर आर्थिक बोजा टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version