नागावच्या मैत्री महिला मंडळाचे महिलांना प्रोत्साहन- राजिम बँक सीईओ मंदार वर्तक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नागावचे मैत्री मंडळ महिलांच्या कलागुणांना वाव देणारं मंडळ अस म्हटलं तर वावग ठरणार नाही. कारण सलग आठ वर्षे फेस्टीवल भरवून उद्योजिका निर्माण करण्याचे काम हे मंडळ करीत आहे. नागावला चांगले निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. अशा प्रकारे फेस्टीवलचे आयोजन करून या व्यवसायाला आणखी उभारी मिळत आसल्याचे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सीईओ मंदार वर्तक म्हणाले.

नागाव येथील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या मैत्री महिला मंडळाने संचालक मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर दोन दिवसांचे नागाव फेस्टीवलेचे आयोजन केले होते. त्याचे उदघाटन र्वतक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील होते. यावेळी नागाव सरपंच निखिल मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर, आक्षी ग्रामपंचायत सरपंच रश्मी पाटील, मैत्री महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा आठवले, भावना जोशी, मेघना केळकर व नागरिक व स्टॉल धारक उपस्थित होते.

खास महिलांसाठी महिलांनी दिलेलं हक्कांच व्यासपीठ म्हणून दोनशेहून अधिक महिाल सदस्य असलेल्या मैत्री महिला मंडळाकडे पाहिले जातं. मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा मिळवून आमदार फंडातून निधीची व्यवस्थाकरून स्वत:ची वास्तू उभी केली हे या मंडळातील महिलांचे श्रेय आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मंडळाच्या माजी अध्यक्षा मेघना केळकर यांनी केले.

या फेस्टीवलमध्ये 42 स्टॉलच्या माध्यमातून विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेषता महिलांच्या आवश्यक वस्तू जास्त असल्यामुळे महिलांची उपस्थिती जास्त दिसत होती. फेस्टीवलच्या निमित्ताने शाळेच्या मैदानावर संध्याकाळच्या वेळी दोन दिवस यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. अशी माहिती मंडळाच्या सह सचिव भावना जोशी यांनी दिली.

Exit mobile version